बीड : मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून देखील दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वीच रासपच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. या दोघा नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तासापासून बंद दाराआड चर्चा सुरू आहे. बंद दाराआड चर्चा एकनाथ खडसे यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची त्यांच्या यशश्री निवासस्थानी जावून भेट घेतली.
यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आज एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्य निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये यावेळी बंद दाराआड चर्चा झाली.
या चर्चेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. धनंजय मुंडेंनी काय म्हटलं होतं? दरम्यान बहीण-भावाची जवळीक वाढत आहे, तुम्ही भविष्यात कमळ हाती घेणार का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा त्या राष्ट्रवादीत येणार का? सध्याची परिस्थिती पहाता धनंजय मुंडे यांचं भाकीत खरं होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
