पुणे : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेसला अपघात होऊन त्यात अनेक प्रवासी मृत्युमुखी पडल्याची व जखमी झाल्याची बातमी क्लेशदायक आहे. देशाच्या रेल्वे इतिहासातील या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवाशांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करतो. दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन भविष्यात असे अपघात घडू नयेत हे सुनिश्चित करावं, असं आवाहन रेल्वे मंत्रालयाला करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी 2 जून) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
यशवंतपूर-हावडा सुपरफास्टने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या काही डब्यांच्या रुळावरून घसरलेल्या बोगींना धडक दिली आणि ती विरुद्ध रुळावर पडली, असे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले. मात्र देशात रेल्वेचे अपघात वारंवार घडत आहेत असे अपघात भविष्यात घडू नये यासाठी उच्चस्तरीय चौकशी करून तोडगा काढा असे पवार यांनी म्हटले आहे.
