पुणे : खासगी सावकारीसह कौटुंबिक हिंसाचार तसेच तत्सम गंभीर गुन्ह्यांची नोंद आणि दुहेरी मोक्का लावण्यात आलेल्या औंधमधील नाना गायकवाड याच्यावर शुक्रवारी येरवडा कारागृहाच्या आवारात तीक्ष्ण शस्त्राने हल्ला झाला. गायकवाड याच्या उपद्रवी कारवायांमुळे त्याला येरवडा कारागृहातून हलवण्याबाबत कारागृह प्रशासनाने नुकताच न्यायालयाला अर्ज सादर केला होता. येरवडा कारागृहात अलीकडच्या काळात तीन मारामाऱ्या झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
गायकवाड आणि कारागृहातील कैद्यांमध्ये दोन महिन्यांपूर्वी हाणामारी झाली. त्यातूनच शुक्रवारी दुपारी त्याच्यावर हल्ला करण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली. कारागृहात स्वतंत्र व्यवस्था होण्यासाठी गायकवाड यानेच हा बनाव रचला आहे ? किंवा कसे याबाबत पोलिसांनी तपास जारी केला आहे. कैद्यांनी कारागृहातील पत्र्याच्या साहाय्याने त्याच्यावर तीक्ष्ण वार केले असल्याचे वैयकिय तपासणीत आढळले आहे. कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत कारागृह प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या प्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस कारागृह हवालदार सुभाष मानसिंग दरेकर, (वय ५४ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. बंदी सुरेश बळीराम दयाळू याने लोखंडी पत्र्याच्या तुकडयाच्या सहाय्याने वार गायकवाड यांच्यावर वार केला आहे.
आज सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास खोली क्र.१ व खोली क्र.१२ हया दोन खोल्यांची तेथे न्यायाधीन बंदी साफसफाई करीत होते. त्यावेळी खोली क्र.१ मधील न्यायाधिन बंदी नानासाहेब शंकरराव गायकवाड हा त्याच्या खोलीच्या समोर खुर्चीवर बसलेला होता. त्यावेळी खोली क्रमांक १२ मधील न्यायाधीन बंदी सुरेश बळीराम दयाळू हा पाठीमागे उभा होता व त्याने पोलिसांची नजर चुकवून कोणतेही कारण नसताना त्याच्या हातातील लोखंडी पत्र्याच्या तुकडयाचे सहाय्याने न्यायाधीन बंदी नानासाहेब शंकरराव गायकवाड याच्या उजव्या गालाच्या वरील बाजूस मारुन त्याला जखमी केले व पाठीमागील खोलीकडे जाऊ लागला.
त्यानंतर पोलिसांनी लागलीच न्यायाधीन बंदी सुरेश बळीराम दयाळू यास लगेचच पकडून त्यांच्या खोलीमध्ये बंद केले. त्यानंतर नानासाहेब गायकवाड यांना उपचारासाठी कारागृह रुग्णालय येरवडा येथे दाखल केलेले आहे. बंदी सुरेश बळीराम दयाळू याच्याविरुध्द वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याच्या यांच्या आदेशाने येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे.

