बारामती: दौंड नगरपालिकेचे फरार माजी नगराध्यक्ष बादशाह शेख याला जिल्हा पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने राजस्थान येथील अजमेर येथे ताब्यात घेतले घेवून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड शहरामध्ये दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी एका मागासवर्गीय कुटुंबाची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली होती. यानंतर त्या कुटुंबाने वरिष्ठ पातळीवरून हालचाल केल्याने दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यासह इतरांविरोधात दलित अत्याचार विरोधी कायदा (अॅट्रोसिटी), जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग आदी कलमान्वये दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच बादशाह शेख व त्याचे साथीदार फरार झाले होते. यातील चार जणांना यापूर्वीच अटक केली आहे.
बादशाह शेख याने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बारामती येथील सत्र न्यायालयात अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळला. तेव्हापासून बादशाह शेख याला शोधण्याकरता पोलिसांनी दोन पथके पाठवली होती. या पथकांनी बादशाह शेखला राजस्थानमधून ताब्यात घेतले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर, सहाय्यक निरीक्षक काळे, हवालदार सचिन घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, बादशहा शेख यांना अटक केल्यानंतर बादशहा शेख यांच्या समर्थनार्थ त् महिलांनी दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढीत या हाणामारी घटनेत बादशाह शेख यांच्या नातलगांना मारहाण करणाऱ्या व महिलेचा विनयभंग करणाऱ्या लोकांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशा मागणीचे निवेदन दौंड पोलिसांना दिले आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास दौंड पोलीस स्टेशन वर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी यावेळी दिला.
या हाणामारी प्रकरणातील विरोधी गटातील लोकांवरही कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी केली असुन यामध्ये अक्षय घोलप, कुणाल घोलप, जमदाडे, अजय घोणे, महेश घोणे ,गोरख घोलप, सागर माढेकर, श्रीनाथ ननवरे, दीपक कांबळे, कोमल जमदाडे व इतर पाच ते दहा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तक्रार अर्ज देण्यात आला.
या अर्जात दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला किराणा आणण्यासाठी जात असताना, वरील नमूद केलेल्या व्यक्ती घोळका करून हातामध्ये तलवार ,काठ्या, गज, चाकू अशी हत्यारे घेऊन मुस्लिम समाजाच्या नावाने शिवीगाळ करीत होते. यापैकी अक्षय घोलप याने तिचा विनयभंग केला, मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सर्वांनी पिडीतेला उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे घाबरून ती घराकडे पळाली, व तीने आपल्या पतीला घडलेली हकीकत सांगितली. दरम्यान ही सर्व लोक तिच्या घरात घुसली व आपल्याकडील तलवार, चाकू या हत्यारांनी त्यांनी तिच्या पतीला मारहाण करीत जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी आलेल्या पीडितेच्या चुलत दिरालाही या लोकांनी जबर मारहाण करीत जखमी केले. पीडित महिलेला सुद्धा मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ही हिसकावून नेले आहे. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी दमबाजी सुद्धा करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने दौंड पोलिसांकडे केली आहे.
यावर दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटिल यांनी आम्ही तुमचे निवेदन स्विकारले आहे, याची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देत सर्वांनी कायदाचे पालन करा, अशा सूचना दिल्या.
