पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) – आम्ही गरीब महिलांना साड्या वाटप करत आहोत. तुम्ही गरीब वाटावे यासाठी अंगावरचे दागिने काढून ठेवा, असे सांगत दोन महिलांची फसवणूक करण्यात आली या घटना दिघी रोड, भोसरी आणि दापोडी येथे घडल्या.
याप्रकरणी ७५ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. २९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत फिर्यादी महिला दापोडी येथील विनीयार्ड चर्च समोरून जात होत्या. त्यावेळी चोरट्यांनी आपसात संगनमत करून ‘आमच्या शेठला बारा वर्षांनी मुलगा झालाय, त्यामुळे ते गरीब लोकांना साडी वाटत आहे, अशी बतावणी केली.
तसेच, फिर्यादी महिलेला बाजूला नेऊन ‘अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा, नाहीतर तुम्ही गरीब वाटणार नाही. त्यामुळे तुम्हाला साडी मिळणार नाही, असे सांगून अंगावरील दागिने काढण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेने काढून ठेवलेले दागिने हातचलाखीने काढून घेत तेथून पळ काढला.
त्यानंतर अशाच प्रकारची दुसरी घटना दिघी रोड, भोसरी येथे घडली. एकाच दिवशी फसवणुकीच्या दोन घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
