पुणे : बाइक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अडीच हजार रिक्षाचालकांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय चौकात ठिय्या आंदोलन करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आम आदमी रिक्षा संघटनेचे आनंद अंकुश यांच्यासह 2500 रिक्षाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी फिर्याद दिली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर सोमवारी विविध रिक्षा संघटनांनी ठिय्या आंदोलन केले होते.
आंदोलक रिक्षाचालकांनी या भागात दुतर्फा रिक्षा लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. आंदोलनामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आदेशाचा भंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत
