चाकण : खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील युवकांची मोर्चेबांधणी करीत आम आदमी पार्टीकडून जोरदार धडक देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, विधानसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आम आदमी युवा आघाडीच्या पुढाकाराने “युवा संवाद” कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार संघात सर्वत्र जोरदार ‘ब्रॅंडिंग’ करण्यात येत आहे.
येत्या दि. ४ डिसेंबर रोजी चाकण येथील मिरा मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असून, राज्यपातळीवरील ‘आप’ चे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. खेड-आळंदीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यासह भाजपाचे वर्चस्व आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मात्र केंद्रात, राज्यात आणि नगर परिषदेत सत्ते असलेल्या स्थानिक नेत्यांकडून अद्यापही सुटलेले नाहीत. परिणामी, मतदार संघातील युवकांच्या मनात असंतोष असून, सनदशीर मार्गानि नगरपरिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकाभिमूख कसा होईल? यासाठी ‘आप’ मैदानात उतरली आहे.
आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर म्हणाले की, राजकीय श्रेयवाद आणि इच्छाशक्तीअभावी अनेक प्रश्न रखडलेले आहेत. पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, अस्वच्छ आणि दूषित पाणीपुरवठा, कचरा समस्या, इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, मतदार संघातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी नाहीत, एमआयडीतील कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्या आहेत. यासह मतदार संघातील नागरिकांची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रशासकीय गतीमानता आणि इच्छाशक्तीही दिसत नाही. याबाबत विचारमंथन करण्यासाठी हा युवा संवाद” आयोजित केला आहे.
