पुणे : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गोवर या आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. राज्यात साडेसहा हजार गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यात 503 रुग्ण निश्चित झाले आहेत. राज्यातील मुंबई, भिवंडी, आणि मालेगांव येथे मोठ्या प्रमाणत गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढत आहे.
महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बाब म्हणजे, गेल्या 2-3 वर्षांपासून कोरोना महामारीने जगभरात आणि भारतातही थैमान घातलं होतं. आता कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच आता गोवरने डोकं वर काढलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे गोवर हा आजार कोविडपेक्षाही ५ पट वेगाने संसर्ग होणारा आजार आहे. आत्तापर्यंत गोवरचे जे रुग्ण आढळून आले आहेत यात बहुतांश जणांचं लसीकरण पूर्ण झालेलं नसल्याचं दिसून आलं आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
