वडगाव मावळ – दुय्यम निबंधकांनी दस्ताची नोंदणी करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सोमवारी (दि.२८) एका वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातच विष पिऊन आत्महतेचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
किरण शांताराम भोसले (रा. बारामती) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पवन मावळातील बेडशे येथील जमीन खरेदीचे दस्त नोंदणी करण्यासाठी किरण भोसले हे वडगाव मावळ येथील दुय्यम कार्यालयात आले होते. भोसले हे खरेदी करत असलेली जमीन ही खाजगी वनिकरण असलेली होती. तसेच या मिळकतीचे त्यांनी चुकीचे मूल्यांकन केले असल्याने दुय्यम निबंधक संतोष जणार्धन कराळे यांनी हा दस्त नाकारला होता. दस्त नाकारल्याच्या कारणावरून किरण भोसले यांनी फिनेल नावाचे विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसानी वेळेत घटनास्थळी धाव घेऊन भोसले यांना पुढील उपचारासाठी सोमटणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
संतोष जणार्धन कराळे (प्रभारी दुय्यम निबंधक) : किरण भोसले हे खरेदी करत असलेल्या जमिनीचे त्यांनी चुकीचे मुळल्याकन केले असल्याने आम्ही दस्त करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून भोसले यांनी स्वत:च पोलिसांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
या संदर्भात किरण भोसले यांनी दुय्यम निबंधक यांना लेखी पत्र देत त्यात असे म्हंटले आहे की, भोसले बेडसे येथील विकत घेत असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कात वानिकरणाचा शेरा असल्याने दुय्यम निबंधक हे दस्त करून देण्यास मागील आठ महिन्यांपासून टाळाटाळ करत होते. मात्र या बाबत शासनाची कोणतीही हरकत नसल्याचे परिपत्रक आम्ही जोडून देखील दस्त नोंदणीस विनाकारण टाळाटाळ करून पैशांची मागणी करत असल्यामुळे मी आपल्या समोर विष पिऊन आत्महत्या करत आहे.
