पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची ओळख निर्भीड नेता म्हणून आहे. ओठात एक पोटात एक, असं अजितदादा करत नाही. मनात आलं ते बोलून दाखवणार, असा अजितदादांचा स्वभाव आहे. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर तर दादा आणखीनच खुलून बोलतात. शहर कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. “सरकारमध्ये असताना किती वेळा मी गृहमंत्रिपद मागितलं, पण वरिष्ठांनी काय दिलं नाय… त्यांना वाटतं याला गृहमंत्रिपद दिल्यावर हा आपलंही ऐकणार नाही.. असं अजितदादा म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची आढाव बैठक संपन्न झाली. या बैठकीत आपल्या भाषणात अजित पवार यांनी मनातील इच्छा कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. “जेव्हा जेव्हा मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हा तेव्हा मी वरिष्ठांकडे गृहमंत्रिपद मागितलं. पण मला दिलं नाही अशी खंत अजित पवार यांनी हसत हसत बोलून दाखवली.
अनिल देशमुख यांच्यावेळीच मी गृहमंत्रिपदाची मागणी केली पण त्यावेळीही मला दिलं नाही. त्यांचं गेल्यावरही मागितलं तर त्यावेळी दिलीप वळसे पाटलांकडे गृहमंत्रालयाची धुरा दिली गेली. माझ्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार दिल्यानंतर मी त्यांचंही ऐकणार नाही, असं वरिष्ठांना वाटतं”, असं अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.
